‘पाकिस्तान मृतदेह मोजतंय आणि काँग्रेस पुरावा मागतंय’

ओडिशा : वृत्तसंस्था – पुरावे मागण्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांचे मृतदेह मोजतो आहे आणि ‘हे’ एअर स्ट्राइकचा पुरावा मागत आहेत असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. ओडिशातील कोरापट येथे ते उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

काँग्रेसचा समाचार घेताना मोदी म्हणाले की, “एअरस्ट्राइकला एक महिना उलटून गेला आहे. पाकिस्तान अजूनही मृतदेह मोजत बसलं आहे आणि काँग्रेस एअरस्ट्राइकचा पुरावा मागते आहे. काँग्रेसने जवानांचा आणि शास्त्रज्ञांचा अपमान केला असून त्यांना योग्य प्रत्युत्तर द्यायलाच हवे” असे आवाहन मोदींनी जनतेला केले आहे. गेल्या सात दशकांत काँग्रेसने गरिबांचा अपमान केला आणि आता ते दिवसरात्र सैन्याचा अपमान करत आहे असेही मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना मोदींनी ओडिशातील बिजू जनता दलवरही सडकून टीका केली. मोदी म्हणाले की, “ओडिशात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधने असतानाही बीजेडीमुळे या राज्याचा विकास होऊ शकला नाही. चिट फन्ड घोटाळा करणारे ओडिशाचा विकास करू शकतात? खाण माफियांना मदत करणारे, आदिवासींचे हक्क हिरावणारे या राज्याचा विकास करू शकतात का ?’ असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केला.

याशिवाय यावेळी बोलताना, लोकांना मजबूत सरकार हवंय की लाचार सरकार हवंय, हा निर्णय सर्वस्वी त्यांचाच आहे असेही मोदी म्हणाले. इतकेच नाही तर त्यांनी केंद्र सरकारच्या उज्वला आणि आयुष्मान भारत योजनेचं कौतुकही केलं. दरम्यान, ओडिशातील मोदींची ही पहिलीच रॅली होती. यानंतर मोदी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रचार सभा घेणार आहेत.