Coronavirus : आता ‘व्हायरस’सोबत जीवन जगायला शिका, इमरान खान यांनी पाकिस्तानी लोकांना सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीशी झुंज देणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या देशातील नागरिकांना या विषाणूसह जगायला शिकण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, लोकांनी व्हायरससह जगण्यासाठी मानसिकरित्या तयार व्हावे. या दरम्यान पाकिस्तानात दोन महिन्यांनंतर शनिवारपासून स्थानिक उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली.

एका वृत्तानुसार, इम्रान यांनी दूरचित्रवाणी संबोधनात म्हटले की, ‘लस तयार होईपर्यंत आपल्याला विषाणूबरोबर जगावे लागेल.’ लॉकडाऊनवर प्रश्न विचारत त्यांनी विचारले की या उपाययोजनेमुळे विषाणूचा संसर्ग रोखला का? वुहान, दक्षिण कोरिया आणि जर्मनीमधील निर्बंध हटवल्यानंतर पुन्हा नव्याने प्रकरणे आढळण्यास सुरू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे

इम्रान म्हणाले, ‘मी पहिल्या दिवसापासून हे म्हणत आहे की विकसित देशांमध्ये ज्या प्रकारचे लॉकडाऊन लागू केले आहे ते आपण राबवू शकत नाही.’ एक आठवड्यापूर्वी पाकिस्तानमध्ये निर्बंध शिथिल केले गेले. त्याअंतर्गत शनिवारपासून मर्यादित देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली. रेल्वे सेवा आणि सार्वजनिक वाहनेही सुरु करण्याची तयारी सुरू आहे.

दीड हजारहून अधिक नवीन प्रकरणे आढळली
नॅशनल हेल्थ सर्व्हिसने शनिवारी एका निवेदनात सांगितले की, पाकिस्तानमध्ये गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाची १,५८१ नवीन प्रकरणे आढळली. यासह संक्रमित लोकांची संख्या ३८ हजार ७९९ झाली आहे. ८३४ पीडितांचा मृत्यू झाला आहे.