पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालकेंना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा अखेरचा दिवस आहे.

या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. तर भगीरथ भालके यांचा अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता भरणे यांच्यासह शिवसेना, काँग्रेसचे जिल्ह्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती असणार आहे. यामुळे राजकीय चर्चेला उधाण लागणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या परिवारातील व्यक्तीला उमेदवारी निश्चित होती. तर त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली.