हिंमत असेल तर मैदानात उतरा ; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना मोठं आव्हान

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही स्वत: लोकसभा निवडणूक का लढवत नाही ? हिंमत असेल तर लोकसभा लढवा असं म्हणत महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना आव्हान दिलं आहे. बीडमधील प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

हिंमत असेल तर स्वतः मैदानात उतरा –

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. धनंजय मुंडेंना लोकसभेच्या मैदानात उतरण्याचं आव्हान देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्याचं नेतृत्व करतो, असं म्हणणारे मागच्या दाराने येतात, स्वतः मात्र निवडणूक लढवत नाहीत, इतरांना पुढे करतात. हिंमत असेल तर लोकसभा लढवा. आणखी एक दिवस उमेदवारी अर्ज भरायला बाकी आहे, तर तुम्ही स्वतः मैदानात उतरा आणि जनता कोणाच्या मागे आहे, हे बघा.’

मी वडिलांचा गड बांधला, त्यांनी चौथरा तरी बांधला का ?-

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांचाही उमेदवारी अर्ज भरण्यात आला. मात्र जाहीर सभा राष्ट्रवादीकडून रद्द करण्यात आली. यासाठी प्रशासनाने परवानगी नाकारल्याचं कारण धनंजय मुंडेंनी सांगितलं. याला प्रत्युत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, बोलवलेले नेते येणार नसल्याने राष्ट्रवादीची आजची सभा रद्द करावी लागली. मात्र आरोप आमच्यावर करतात. त्यांचा रडीचा डाव लहानपणापासून माहीत आहे, मात्र आपण बोलत नाही. माझ्यावर ते नेहमी टीका आणि आरोप करतात. पण मी कोणाला घाबरत नाही. मी वडिलांचा गड बांधला, त्यांनी चौथरा तरी बांधला का? असा सवालही यावेळी पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना केला.

बीडमध्ये रॅली काढून विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर बीड शहरातील माने कॉम्प्लेक्सजवळ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राम शिंदे, शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर, रासप नेते महादेव जानकर उपस्थित होते.