शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्यांमुळे भ्रष्टाचार वाढेल : पंकजा मुंडे

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या राज्य शासनाच्या धोरणानुसार 15 टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने तर जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. ठाकरे सरकारच्या या निर्णावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आक्षेप नोंदवला आहे. शिक्षकांच्या ऑफलाईन पद्धतीने होणार्‍या बदल्यांमुळे भ्रष्टाचार वाढेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणावर ठाकरे सरकारने पुन्हा एकदा विचार करावा, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीने होणार असे ऐकले आहे. ज्याचा वशिला नाही, वाली नाही आणि त्या गरीब शिक्षकांसाठी हा ऑफलाईनचा निर्णय कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणणार आहे. राज्य सरकारने यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. पारदर्शकता आणि मेरिट सोडून भ्रष्टाचार व शोषण होईल असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

यंदा जिल्ह्यांतर्गत बदल्या ह्या सामान्य प्रशासनाकडून कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने करणे शक्य नाही. त्यामुळे जिल्हांतर्गत बदल्या सध्या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठीची प्रक्रिया यापूर्वी सुरु केली असून त्या अनुषंगाने शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या ह्या प्रचलित धोरणानुसार ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत.