पंकजा मुंडेंची मंत्री धनंजय मुंडेंवर टीका, म्हणाल्या – वाईट काम केले तर…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – सामान्यांच्या हिताचे निर्णय या सरकारने घेतले तर कौतूक करू. पण बीड जिल्ह्याची मान खाली जाईल असे काम कोणत्याही नेत्याने करू नये. कायदा सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करणे सरकारचे काम आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्या बीड भाजप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

बीड जिल्हा पुन्हा गुंडगिरीकडे वळू लागला आहे. मागच्या पाच वर्षात जिल्ह्याचं नाव फार मोठं झालं. मुलींची संख्या वाढवली, विकासाची कामं केली, पीक विम्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. अशी प्रतिमा मिळवलेला बीड जिल्हा पुन्हा गुंडगिरीकडे वळला आहे, अशी परिस्थिती आहे. 1995 ते 1999 च्या कालावधीत बीड जिल्ह्यात जे नको होतं, स्व. मुंडे साहेबांना नापसंत होतं, तेच पुन्हा होत असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता इशारा दिला. त्या म्हणाल्या, गुंडगिरीचा सामान्य माणसाला त्रास होत आहे. यामध्ये राजकीय विरोध काहीच नाही. सरकार येतं आणि जातं, नेते येतात आणि जातात, पालकमंत्री येतात आणि जातात. सामान्य लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

विरोधाला विरोध कधीच करत नाही. चांगले काम केले तर पाठीशी राहू, अन वाईट काम केले तर पाठीत धपाटा घालू. सरकारनं अद्याप कोणतेच वाईट काम केले नाही. सरकार सध्या जुन्या सरकारच्या योजना बंद करण्यात व्यस्त आहे. अद्याप निर्णय घेत नाही. जर घेतलेला निर्णय आवडला नाही तर रस्त्यावर उतरु असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

You might also like