‘कोरोना’च्या भीतीमुळे ST बस पूर्ण क्षमतेने चालविण्यास विरोध

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउननंतर तब्बल सहा महिन्यांनी सुरु करण्यात आलेली एसटी आर्थिक नुकसानीतून बाहेर पडण्यापुर्वी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कोरोनानंतर पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी चालवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असला, तरी प्रवासी आणि एसटी कामगार संघटनांनी त्याला विरोध केला आहे. संसर्गाचा धोका असल्याने आणखी काही काळ तरी पूर्वीप्रमाणेच 50 टक्के क्षमतेने फेर्‍या चालविण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्यभरात लांब पल्ल्याच्या मार्गावर तासनतास प्रवास होतो. अशा वेळी प्रवासात अंतर नियम पाळायचे झाल्यास आंतरजिल्हा वाहतुकीत 22 प्रवाशांना परवानगी असायला हवी, असे मत गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले. एसटी तोटयात आहे म्हणून प्रवाशांचा जीव धोक्यात घालू नये. कर्मचार्‍यांच्या वेतनाचा भार शासनाने उचलावा, अशी मागणी कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के यांनी केली. चालक-वाहक, अभियांत्रिकी व अन्य कर्मचार्‍यांना मास्क, हातमोजे, सॅनिटायझर देण्यात यावेत, चालक केबिनला प्लास्टिकचे पडदे असावे, प्रवाशांची व चालक-वाहकांची तपासणी केली जावी, वाहकाला संरक्षक अ‍ॅप्रॉन मिळावा अशा मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या. परंतु, त्या पूर्ण न करता पूर्ण क्षमतेने गाडया चालवून कर्मचार्‍यांचा जीव आणखी धोक्यात टाकला जात आहे, अशी नाराजी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त के ली. दरम्यान, 17 सप्टेंबपर्यंत आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत एसटी प्रवासी वाहतूक 50 टक्के प्रवासी क्षमतेनेच होत होती. त्या वेळी दररोज प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या 4 लाख 90 हजार 738 होती. यासाठी 4 हजार 410 बसच्या 16 हजार 347 फेर्‍या चालवण्यात आल्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like