पवार यांचा आ.राहुल कुल यांना पाठिंबा, राष्ट्रवादीची डोकेदुःखी वाढली

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा बुलंद आवाज म्हणून ख्याती मिळवलेले आणि आपल्या भाषण शैलीतून भल्याभल्यांना गारद करणारे नंदू पवार यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला पाठिंबा जाहीर केल्याने दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. नंदू पवार यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीशी फारकत घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आ.राहुल कुल यांचे राजकीय वर्तुळामध्ये पारडे अजून जड झाले असल्याचे बोलले जात आहे.

नंदू पवार यांच्या पत्नी मीनाक्षी पवार या दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुक लढवत असताना त्यांचा अवघ्या १२० मतांनी पराभव झाला होता. त्यांच्या विरोधामध्ये दौंडचे जेष्ठ नेते प्रेमसुख कटारिया यांच्या सुनबाई शीतल कटारिया या कुल गटाकडून निवडून आल्या होत्या. नंदू पवार आणि प्रेमसुख कटारिया यांच्यामध्ये आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाबाबत दिलजमाई झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला दौंड तालुक्यामध्ये ही धोक्याची घंटा समजली जात आहे. याबाबत नंदू पवार यांनी बोलताना दौंड तालुक्याच्या विकासासाठी मी काँग्रेस चा कार्यकर्ता असून सुध्दा आमदार राहुल कुल यांच्या पाठीशी उभा राहणार असून सध्या दौंड शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत.

तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी आला आहे. आजपर्यंत कोणत्याच आमदाराने एवढा निधी आणला नाही आणि कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी तो दिला नाही. राज्यात काँग्रेस चे सरकार स्थापनेसाठी आणि शरद पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी विनाअट पाठिंबा देणारे माजी आमदार स्व.सुभाष अण्णा कुल होते. मात्र त्या किंवा त्यानंतरच्या काळात देखील दौंड तालुक्याची मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीने कधी दखल घेतली नाही. दौंड तालुक्याला राष्ट्रीय पक्षाची लोकसभेची उमेदवारीची संधी कधी देण्यात आली नव्हती मात्र ती संधी कांचन कुल यांच्या रूपाने तालुक्याला देण्यात आली होती ही निश्चित तालुक्यासाठी अभिमानाची बाब होती.

दौंड नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत आहे. मात्र अशा नगरपालिकेला आमदार राहुल कुल यांनी शहराच्या विकासासाठी 125 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनामार्फत मिळवून दिला आहे. त्यामुळे शहराच्या खुंटलेल्या विकासाचे चित्र आत्ता बदलत आहे. तालुक्याच्या आजू बाजूच्या भागात अनेक मुख्यमंत्री मंत्री होऊन गेले मात्र देवेंद्र फडणवीस व आमदार कुल यांच्या रूपाने विकासाची गंगा जोमाने सुरू झाली असल्याने मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून तसेच माझ्या पत्नीने नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली असताना ही मी राहुल कुल यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार कशासाठी असतो!
जेष्ठ नेते नंदू पवार यांनी आमदार कशासाठी व्हायचं असतं तर तालुक्याचा विकास करण्यासाठी , शांतता निर्माण करण्यासाठी, राजकीय आकस न ठेवता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेण्यासाठी आमदार व्हायचं असतं असे सांगत हे सर्व गुण आमदार कुल यांच्यात दिसून आले असल्यामुळे मी त्यांच्या मागे ठामपणे उभा राहणार असल्याचेही नंदू पवार यांनी शेवटी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –