PCMC : दोन लाख न दिल्याने ‘त्या’ व्यापाऱ्याची हत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन
पिंपरीत व्यापाऱ्याची गळा दाबून हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या दरम्यान घटना उघडकीस आली होती. प्रदीप विरुमल हिंगोरानी (वय:५१) असे हत्या झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ही हत्या दोन लाख रुपये न दिल्यामुळे झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सचिन भालेराव (वय: ३५) या आरोपीला पिंपरी पोलिसांनी गजाआड केले असून आरोपीला १४ मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,”मयत प्रदीप विरुमल हिंगोरानी (वय:५१) रा.पिंपरी मार्केट,याचा साबणाचा व्यवसाय होता त्यामुळे त्याच्याकडे पैसे असल्याचे आरोपीला अगोदरच माहिती मिळाली होती, तसेच तो व्याजाने पैसे देत असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांची ही दुसरी भेट होती,या अगोदर मित्राने त्यांची ओळख करून दिली होती. त्या रात्री आरोपी सचिन भालेराव रा.मूळ सोलापूर हा उशिरा हिंगोरानी यांच्या घरी गेला आरोपीला दोन लाख रुपयांची अत्यंत गरज होती. यासाठी तो जवळपास एक तास प्रदीप यांच्याकडे विनवणी करत होता.

परंतु त्यांनी काही पैसे न दिल्याने अखेर शेजारी असलेल्या टॉवेलने व्यापारी प्रदीप यांची गळा आवळून सचिनने हत्या केली आणि घरातील ३८ हजार रुपये घेऊन तेथून पळ काढला. सचिन अत्यंत घाबरलेल्या स्थितीत होता. त्याने थेट मूळ गाव सोलापूर गाठले. पिंपरी पोलिसांच्या टीमने अवघ्या दोन दिवसातच आरोपीला राहत्या घरातून पकडले असून त्याने गुन्हा कबूल केला आहे. आरोपी सचिन भालेरावला १४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे,पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे,सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव,गुन्हे पोलीस निरीक्षक मसाजी काळे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास मुंढे,पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे,सागर पाटील यांनी केली आहे.