नव्या वाहतूक नियम उल्लंघनाच्या दंडाची ‘रक्कम’ महाराष्ट्रात लागू नाही, लवकरच ‘दर’ बदलणार : दिवाकर रावते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकाराने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर भरमसाठ दंड आकारण्याची घोषणा केली आहे. परंतू हे दंड किती असावे याबाबत निर्णय घेण्याची मुभा राज्य सरकारला देखील देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे आकारण्यात येणारी दंडाची मोठी रक्कम महाराष्ट्रात आकारण्यात येणार नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकार दंडाची रक्कम स्वत: ठरवणार आहे, दंडाची रक्कम आचारसंहितेपूर्वी ठरवण्यात येईल असे देखील रावते यांनी सांगितले. ‘शिवाई बस’च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांकडून दंड आकारण्यात यावा या मताचे आम्ही नाही, सचिवांनी विधी खात्याला या संबंधित माहिती कळवली आहे, विधी खात्याचे मत आल्यानंतर संबंधित निर्णय जाहीर होईल असे दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.

वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास नवे दर केंद्र सरकारकडून लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार ही दंडाची रक्कम मोठी आहे. अनेक नियमांच्या उल्लंघनावर 5000 ते 10000 रुपयांपर्यंतचा दंड आहे.

हे नियम लागू करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. या भरमसाठ दंडाला नागरिकांकडून विरोध होत आहे. परंतू राज्यातील दर राज्य सरकार ठरवणार असल्याचे मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले. तसेच या दरांची रक्कम केंद्र सरकारने ठरवलेल्या दरांएवढे नसतील. हे नवे दर आचारसंहितेपूर्वी ठरवण्यात येतील.

आरोग्यविषयक वृत्त