Coronavirus Lockdown : हे फक्त भारतातचं होऊ शकतं : ‘लॉकडाऊन’चा आदेशाला बगल देत जमावाकडून आंदोलन

बूंदी/राजस्थान : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेला गर्दीपासून आणि लोकांमध्ये सामाजिक अंतर रहावे यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. मात्र, राजस्थानमध्ये लॉकडाऊनचा कोणताही परिणाम होताना किंवा लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याचे पहायला मिळत आहे.

राजस्थानमधील बूंदी येथे लॉकडाऊनला धूडकावून लावत अनेक लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. लोकांना रेशन दुकानात धान्य मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गर्दी करून निदर्शने केली.

धान्य मिळत नसल्याचा आरोप
लोकांचा आरोप आहे की राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्वस्त धान्य दुकानामध्ये स्वस्त गहू देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दुकानामध्येच धान्य उपलब्ध नसल्याने नागरिकांना धान्य मिळण्यास अडचणी येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करणाऱ्यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या या परिस्थितीत त्यांना स्वस्त धान्य मिळत नाही, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
लोकांनी असेही सांगितले की, सरकारने वेळीच यामध्ये लक्ष घातले पाहिजे. स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळाले नाही तर मोठ्या समस्या उद्भवू शकतात. घरातील लोकांना अन्न मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकारी यांची भेट घेता आली नाही. पोलिसांनी निदर्शन करणाऱ्या नागरिकांना तेथून हाकलून देण्यात आले. लोकांनी एकाच वेळी गर्दी केल्याने या ठिकाणी कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.