पुणे-सोलापूर रस्त्यावर कवडीपाट ते लक्ष्मी कॉलनी दरम्यानच्या भाजीपाला बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी स्थानिक पातळीवरही दक्षता घेतली जात आहे. मात्र, मार्केट बंद असल्यामुळे दररोज पहाटेपासून सोलापूर रस्त्यावर कवडीपाटी टोलनाका ते लक्ष्मी कॉलनी दरम्यान भाजीमंडई भरत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना  बंदी असल्यामुळे भाजीविक्रेते आणि खरेदीदार यांच्यासाठी हक्काचे ठिकाणच झाले आहे.

कोरोनाबाधित क्षेत्रातून अनेक व्यापारी भाजीपाला खरेदीसाठी येत असल्याने सोलापूर रस्त्याच्या दुतर्फा कवडीपाट ते लक्ष्मी कॉलनी दरम्यानच्या नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून या परिसरातील नागरिक घरात थांबले आहेत. मांजरी उपबाजार बंद ठेवला आहे. त्यातून ही मंडळी येत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता असल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.

मार्केट बंद असल्याने शेतकरी ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी येथे आणत असून, भाजीपाला खरेदीदार शहरातून येथे येतात. मात्र, या ठिकाणी शेतकऱ्यांकडून दलाल भाजीपाला खरेदी करून व्यापारी आणि खरेदीदारांना विकत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही, तर दलालच त्याचा लाभ उठवत आहेत.

पुणे शहर आणि उपनगर परिसरातून भाजीपाला खरेदीसाठी छोटेमोठे टेम्पो येथे येतात. मात्र, रात्रभर पोलिसांची गस्त असल्यामुळे टेम्पोचालक अंतर्गत रस्त्यावर भरधाव वेगाने टेम्पो पळवित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघातसदृशस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी ठिकठिकाणी काठ्या, सिमेंटचे पाईप, बॅरिगेट लावून रस्ते बंद केले आहेत. तरीसुद्धा टेम्पोचालक पहाटेच्या वेळी रस्त्यातील अडथळे बाजूला करून अंतर्गत रस्त्यावर वाहने दामटत आहेत.

सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा येथे पोलिसांची 24 तास गस्त सुरू आहे. त्यामुळे टेम्पोचालक लक्ष्मी कॉलनीतून गोंधळेनगर, सातववाडी मार्गे पुणे शहरात जात आहेत. नव्याने तयार झालेले भाजीविक्रेत्यांना अटकाव घालणे गरजेचे आहे. शहरातून भाजी खरेदीसाठी येणाऱ्यांची तपासणी झाली नसेल, तर त्यांना परत पाठविणे हीच बाब महत्त्वाची ठरणार आहे, असे येथील नागरिकांनी सांगितले.

दत्ता देवकर म्हणाले की, शहरामध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन केले आहेत. त्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधून भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या वर्गामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पोलीस यंत्रणेनेच आता पुढाकार घेऊन भाजीविक्रीचा परवाना नसणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करून त्यांची भामटेगिरी बंद करावी, अशी देवकर यांनी केली आहे.