… म्हणून त्या क्षेत्रातील ‘सलून’ला देणार परवानगी

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. विशेषतः केशकर्तनालय बंद असल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर 4 मेपासून सुरू होणार्‍या टाळेबंदीच्या तिसर्‍या टप्प्यात हरित व नारिंगी क्षेत्रांमध्ये केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली जाईल; तसेच ई-कॉमर्स कंपन्यांकरवी जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या विक्रीचीही मुभा दिली जाईल, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.

गृह मंत्रालयाने शुक्रवारी लॉकडाउनची मुदत 17 मेपर्यंत दोन आठवडयांसाठी वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर हरित व नारिंगी क्षेत्रांमधील अनेक निर्बंध उठवले होते. या दोन क्षेत्रांमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या विक्रीवर काही निर्बंध असणार नाहीत, असे गृह मंत्रालयाने सांगितले आहे. संबंधिता भागांमध्ये केशकर्तनालये आणि सलूनही उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

लाल क्षेत्रांमध्ये (रेड झोन) ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तू विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र केशकर्तनालये व सलून या वस्तू नसून सेवा असल्याने त्यांना या क्षेत्रांमध्ये उघडण्याची परवानगी मिळालेली नाही. नारंगी क्षेत्रांमध्ये एक चालक व दोन प्रवाशांसह टॅक्सी व कॅब चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. परवानगी असलेल्या उपक्रमांसाठी व्यक्ती आणि वाहनांच्या आंतर- जिल्हा वाहतुकीला मुभा आहे. यासाठी चार चाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त 2 प्रवाशांना प्रवास करता येईल. सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या निकषांमध्ये यासाठी परवानगी दिली गेली नव्हती. मात्र, नारंगी क्षेत्रांमध्ये बसगाडयांच्या आंतर-जिल्हा व जिल्ह्यांतर्गत वाहतुकीवरील बंदी कायम राहणार असल्याचे मंत्रालयाने सांगितले.