काय सांगता ! होय, ‘वाय-फाय’ दुरुस्तीसाठी थेट ‘नासा’तून आला माणूस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे भारतासह जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या आहेत. इंग्लंड-वेस्ट इंडिज पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी खेळवण्यात आली. पण भारतीय संघ मात्र ऑगस्टच्या आधी मैदानात उतरणार नाही, हे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व भारतीय क्रीडापटू आणि त्यांचा सहाय्यक कर्मचारी वर्ग घरी विश्राम घेत आहेत. सर्व समालोचकदेखील घरातून शक्य तितके काम करत आहेत. याचदरम्यान प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी एक भन्नाट फोटो पोस्ट केला आहे.

बहुतांश लोक वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारत काम करत आहेत. त्यामुळे घरातील वाय-फायचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. काही वेळा वाय-फायचा स्पीड कमी जास्त होण्याची प्रकरणेही दिसून येतात. वाय-फाय संबंधीची अशीच एक तक्रार भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी केली. घरात बसून विविध लोकांच्या ऑनलाइन मुलाखती घेण्यासाठी संजय मांजरेकर यांना वाय-फाय दुरूस्ती तातडीने गरजेचे असणार आहे. त्यामुळेच त्यांनी वाय-फाय दुरूस्तीसाठी कंपनीच्या कर्मचार्‍याला बोलावले होते. सध्या करोना संसर्गाचा धोका असल्याने तो कर्मचारी वाय-फाय दुरूस्तीसाठी पीपीइ किट घालून आला होता. त्याचा फोटो पोस्ट करत, वाय-फाय दुरुस्तीसाठी थेट ‘नासा’तून माणूस आला, असे मजेशीर कॅप्शन त्यांनी फोटोला दिले आहे.