सराईत गुन्हेगाराकडून 6 वाहने जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराकडून पाच दुचाकी, एक ऑटोरिक्षा, एक महागडे घड्याळ आणि रोख रक्कम असा दोन लाख 60 हजारांचा ऐवज जप्त केला. सुरज उर्फ सुरज्या चंद्रकांत कु-हाडे (21, रा. बालाजीनगर, झोपडपट्टी, भोसरी) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी विजय दौंडकर आणि नवनाथ पोटे यांना माहिती मिळाली की, एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील व तडीपार गुन्हेगार भोसरी परिसरात आला आहे. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे कारवाई करून चौकशी केली.

आरोपीने एमआयडीसी, फुलेनगर, शाहूनगर, नेहरूनगर, पिंपरी येथून दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून पाच दुचाकी, एक अॅपल कंपनीचे पाच सिरीज सेल्युलर मनगटी घड्याळ आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील सहा आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सतीश नांदुरकर, उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस कर्मचारी रवींद्र तिटकारे, भोर, नवनाथ पोटे, विजय दौंडकर, करन विश्वासे, अनिल जोशी, अमोल निघोट यांच्या पथकाने केली आहे.