पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चा आणखी एक बळी, 81 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   करोनाची लागण झाल्याने उपचार घेत असलेल्या ८१ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड “करोना’चा शहरातील चौथा बळी गेला आहे. तर हद्दीबाहेर रहिवाशी असलेल्या चार जणांचा मृत्यू झाला असू मृत्यूचा एकूण आकडा ८ वर पोहोचला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात भोसरी येथे राहणाऱ्या एका 81 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली होती. तिच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. रविवारी या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड शहरात आत्तापर्यंत चार जणांचे करोनामुळे बळी गेले आहेत. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या शहराच्या हद्दीबाहेरील चौघांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील करोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला. थेरगाव येथील पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर 20 एप्रिल रोजी पुण्यात उपचार घेणाऱ्या निगडीतील महिलेचा मृत्यू झाला. तर पुण्यातमध्ये राहत असलेल्या परंतु वायसीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेचाही याच दिवशी मृत्यू झाला. त्यानंतर 24 एप्रिल रोजी ओटास्कीम निगडी येथे राहणाऱ्या एका पुरूषाचा मृत्यू झाला. तर 29 एप्रिल रोजी खडकी येथे राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. 6 मे रोजी शिवाजीनगर आणि येरवडा, पुणे येथे राहणाऱ्या दोन महिलांचा पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आज 10 मे रोजी भोसरी येथील 81 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला.