लोणावळ्यात पर्यटकाने केला हवेत गोळीबार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – देशासह, राज्य, पुणे जिल्ह्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असल्याने पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी जिल्हाधिकारी यांनी बंद ठेवले आहेत. हा जिल्ह्याधिकारी यांचा नियम झुगारून, पोलिसांची नजर चुकवून काही पर्यटक लोणावळा येथील सहारा ब्रिज येथे मौजमजेसाठी आलेल्या पर्यटकांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी सागर मोहन भूमकर याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, ज्या पिस्तूलातून हवेत गोळीबार करण्यात आला, ते पिस्तुल देखील लोणावळा पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्य आरोपी सागर मोहन भूमकर (३५), संदीप हनुमंत जाधव (३६), सचिन बाळासाहेब भूमकर (३५), सचिन साहेबराव मांदळे (३८, सर्व रा. वाकड)अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस कर्मचारी माणिक विलास अहिनवे यांनी लोणावळा पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा परिसरात पर्यटनस्थळी पर्यटकांना येण्यास जिल्ह्याधिकारी यांनी मज्जाव केलेला आहे. परंतु, काही पर्यटक शासनाचे नियम झुगारून व पोलिसांची नजर चुकवून भुशी धरण, सहारा ब्रिज येथे मौजमजेसाठी येत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास लोणावळा पोलिसांची नजर चुकवून आरोपी सागर यांच्यासह इतर मित्र सहारा ब्रिजवर मोटारीने गेले होते. तेव्हा तिथे मोटारीत मोठ्या आवाजात गाणे लावून धिंगा मस्ती करत असताना सागरने परवाना धारक पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. या प्रकरणी त्याच्यासह इतर मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास लोणावळा पोलीस करत आहेत.