पिंपरीत भांडणातून अपहरण करून मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भांडणाच्या रागातून दोघांनी एकाचे अपहरण करून मारहाण केली. त्यांच्या पत्नी व मुलाला देखील मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री एक वाजता कुदळवाडी, चिखली येथे घडली. दर्शन वसंत ढोबळे (23), राहुल विजय ढोबळे (22, रा. विमाननगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 50 वर्षीय व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे धुलीवंदनाच्या दिवशी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच कारमधून त्यांचे अपहरण केले. अहमदनगर रोडवरील आळंदी फाटा येथे नेऊन आणखी मारहाण केली आणि सोडून दिले. आरोपींनी फिर्यादी यांना ‘आता तुमच्या मुलाची व पत्नीची बारी आहे’ अशी धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.