पिंपरी : मुंबईच्या व्यवसायिकाचे आकुर्डी येथून 35 लाखांसाठी अपरहण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईहून आपल्या मॅनेजर सह आलेल्या एका व्यवसायिकाचे अपहरण झाल्यानंतर निगडी पोलिसानी सापळा रचून त्याची सुखरुप सुटका केली आहे. अपहरणकर्त्यांनी त्याची सुटका करण्यासाठी 35 लाख रुपयांची मागणी केली होती. ही घटना शनिवारी आकुर्डी येथे घडली.

राहूल तिवारी (27, सध्या रा. सिल्व्हर सेव्हन हॉटेल, आकुर्डी) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमर कदम, शशांक कदम आणि हरिश राजवाडे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी राजकुमार मनोहरसिंग (43, रा. लोखंडवाला कॉम्प्लेक्‍स, कांदिवली, मुंबई) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार हे आपले मॅनेजर राहूल तिवारी यांच्यासह आकुर्डीतील सिल्व्हर सेव्हन या हॉटेलमध्ये कामानिमित्त राहण्यासाठी आले होते. त्यांचा मॅनेजर राहूल तिवारी हा काळेवाडीतील नाना काळे यांच्याकडून गुंतवणूकीसाठी पाच लाख रुपये आणण्यासाठी गेला होता. त्याचा शनिवारी फिर्यादी राजकुमार यांना फोन आला. मी पाच लाख रुपये आणले आहेत, मात्र मला वाचवा, असे म्हणून त्यांनी फोन कट केला.

अर्धा तासाने राजकुमार यांनी राहूल यांच्या मोबाइलवर फोन केला असता तो राजकुमार याच्या ओळखीच्या अमर कदम याने उचलला. राहूलला सोडायचे असेल तर 35 लाख रुपये द्या, असे म्हणत खंडणीची मागणी केली.

दोन तासांनी पुन्हा राहूल याच्या फोनवरून राजकुमार यांना फोन आला. आत्ताच्या आत्ता पैसे द्या नाहीतर राहूलला मारून टाकु, अशी धमकी दिली. रविवारी सकाळी दहा वाजता पुन्हा राहूल यांच्या फोनवरून फोन आला. त्यावेळी राजकुमार यांनी पैशाची व्यवस्था करीत असल्याचे सांगितले.

सोमवारी (दि. 12) पुन्हा आरोपींचा फोन आला व त्यांनी पैशाची व्यवस्था झाली का, अशी विचारणा केली. मात्र बॅंकेच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्याचे राजकुमार यांनी सांगितले. माझी माणसे पाठवतो त्यांना पैसे देऊन टाका, असे आरोपींनी सांगितले. खंडणीसाठी वारंवार फोन येऊ लागल्याने अखेर राजकुमार यांनी पोलिसांत धाव घेतली.

निगडी पोलिसांनी सापळा लावून आरोपींना मंगळवारी पहाटे डांगे चौक परिसतून ताब्यात घेतले. तसेच अपरहण झालेल्या राहुल तिवारी यांची सुखरूप सुटका केली. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.