पिंपरी : रहाटणीमधील तरुणाची आत्महत्या नसून ‘हत्या’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन तिघांनी तरुणाचे हात पाय बांधून, दोरीने गळा आवळून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह ठेवला होता. वाकड पोलीसानी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रहाटणी येथे शनिवारी (दि. ९)दुपारी घडला होता.

विजय रामदास वखरे (२८, रा. भालेराव कॉलनी, रामनगर, रहाटणी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गणेश वखरे, रामदास वखरे, चंचल वखरे (रा. रामनगर, रहटणी) या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विजय यांचे शुक्रवारी आपल्या पत्नीसोबत भांडण झाले. या भांडणामध्ये त्याचा भाऊ गणेश आणि वडील रामदास यांनी मध्यस्थी केली. यामुळे संतापलेल्या विजयने वडिलांच्या हाताला चावा घेतला. तसेच भावावर चाकूने वार केले. याबाबत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज (शनिवारी) दुपारी विजय आणि गणेश यांच्यामध्ये पुन्हा भांडण झाले. त्यावेळी विजय याने स्वतःचा दोरीने गळा आवळून घेतला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे भाऊ गणेश वखरे याने पोलिसांना सांगितले. मात्र ही आत्महत्या नसून खून असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. पोलिसांनी तपास केला असता चाकूने वार केल्याचा राग मनात धरुन विजयचे हातपाय बांधून, दोरीने गळा आवळून खून केल्याने समोर आले आहे. तपास वाकड पोलीस करत आहेत.