पिंपरी : ‘बुलेटराजा’कडून आठरा लाखांच्या 14 महागड्या दुचाकी जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   पिंपरी चिंचवड शहरासह इतर ठिकाणी विशेषतः बुलेट आणि महागड्या दुचाकी चोरणाऱ्या ‘बुलेट राजा’ला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 10 बुलेट आणि अन्य 4 अशा एकूण 17 लाख 70 हजार रुपये किमतीच्या 14 महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेमंत राजेंद्र भदाने (24, रा. भोरवाडा, सातपुर, नाशिक) असे अटक केलेल्या बुलेट राजाचे नाव आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, भोसरी येथुन के.टी.एम. मोटार सायकल चोरी केलेला एक चोर भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाचे समोर येणार आहे. पोलिसांनी दोन पथके तयार करून सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी हेमंत पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली करता त्याने 1 सप्टेंबर रोजी धावडेवस्ती, भोसरी येथुन केटीएम मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पिंपरी चिंचवड व पुणे परीसरातुन बुलेट, एफ झेड, के टी एम, पल्सर अशा महागड्या मोटार सायकली चोरी करून त्या बीड, अहमदनगर, धुळे या भागातील नागरीकांना कागदपत्रे नंतर देतो असे सांगुन विकल्याचे समोर आले.

पोलिसांनी धुळे, बीड, नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर मधून 10 बुलेट, 2 एफ झेड, 1 के.टी.एम व 1 पल्सर अशा 17 लाख 70 हजार रुपये किमतीची एकुण 14 दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, वाकड, एमआयडीसी भोसरी, चाकण येथील सहा, पुण्यातील चार आणि नाशिक जिल्ह्यातील दोन असे एकूण 12 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

त्याच्या एक साथीदार योगेश सुनील भामरे (24, रा. धुळे) याला ही पोलिसांनी अटक केली आहे. दुचाकीचे लॉक तोडायचा आणि वायरिंग जोडून दुचाकी सुरू करून चोरून न्यायचा. 12 ते 15 हजार रुपयांना तो वाहने विकत असे. नाशिक आणि ठाणे शहरात 37 गुन्हे दाखल आहेत. 2015 सालापासून तो वाहनचोरी करत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत आरोपीने आपला मोर्चा पुण्याकडे वळवला. इथून त्याने काही दुचाकी वाहने चोरली आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधिर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, बाळु कोकाटे, अमित गायकवाड, नितीन खेसे, गणेश सावंत, विजय मोरे, प्रमोद गर्जे, मारूती जायभाये, विशाल भोईर, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.