धक्कादायक ! कामाच्या पैशांची मागणी केल्यानंतर पेट्रोल टाकून पेटवलं

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर ताथवडे येथे धक्कादायक घटना घडली आहे. कामाचे पैसे मागितले म्हणून ठेकेदार आणि त्याच्या साथीदाराने कामगारास भरदिवसा पेट्रोल ओतून जाळले. यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सुभाष विश्वनाथ साह (33, रा. लेबर कॅम्प, ताथवडे. मूळ रा. चकईनायत, ता. जि. वैशाली, बिहार) असे जखमी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी साह याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद अन्वर झुमरातिया (40, रा. तापकीरनगर, पुणे), संतोषकुमार हरकराम (36, रा. ताथवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर ताथवडे येथे सर्व्हिस रोडच्या बाजूला एका बांधकाम साईट सुरू आहे. त्या साईटवर आरोपी मोहम्मद हा ठेकेदार असून आरोपी संतोषकुमार फोरमन आहे. तर जखमी सुभाष हे ठेकेदाराकडे सेंट्रिंगचे काम करत होते. सुभाष यांनी त्यांच्या कामाचे पैसे आरोपी ठेकेदाराकडे वारंवार मागितले.

पैसे मगितल्याच्या रागातून आरोपीने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून 3 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता सुभाष यांना ठार मारण्याचा उद्देशाने त्यांच्यावर पेट्रोल ओतले. त्यानंतर माचीसच्या काडीने सुभाष यांना पेटवून दिले. तसेच आरोपीच्या साथीदारांनी सुभाष यांना इंजेक्शन देऊन घडलेली हकीकत न सांगता खोटी हकीकत सांगण्यास भाग पाडले. जखमी सुभाष यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठेकेदादाराने भरदिवसा रस्त्यावर कामगाराला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.