काय सांगता ! होय, चक्क पोलिस निरीक्षकाच्या केबिनमध्ये घुसून धक्काबुक्की अन् शिवीगाळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये घुसून, धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 17) सकाळी घडला.

रुपेश ज्ञानेश्वर वाघुले (28, रा. दारुंब्रे, ता. मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे. रुपेश याच्यावर दंगल आणि अन्य असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका दंगलीच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार हे करीत आहेत. त्या गुन्ह्यात आरोपीचे वाहन जप्त करायचे होते. मात्र, तो टाळाटाळ करीत होता.

पोलिसांनी तपासासाठी बोलावून देखील तो हजर राहत नव्हता. गुरुवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास रुपेश तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी पोलीस निरीक्षक पवार आपल्या केबिनमध्ये होते. रुपेश थेट पवार यांच्या केबिनमध्ये घुसला आणि त्याने पवार यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली व पोलीस निरीक्षक पवार यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ आणि दमदाटी केली. यावरून त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे तपास करीत आहेत.