दुर्दैवी ! पिंपरीत दोघा सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच पिंपरीतील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनाने दोघा सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील एका भावाचे अडीच वर्षापूर्वी लग्न झाले होते. तर दुसऱ्या भाऊ येत्या दिवाळीत विवाहबंधनात अडकणार होता. पण कोरोनाने त्याचे स्वप्न हिरावून नेले आहे.

आदित्य विजय जाधव आणि अपूर्व जाधव (रा. आकुर्डी) अशी या दोन मृत भावंडांची नाव आहेत. प्राप्त माहितीनुसार, आदित्य आणि अपूर्व या दोघासोबतच आई-वडील आणि आदित्यची पत्नी यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. या 5 ही जणांना पिंपरीतील वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल केले होते. कोरोनाला हरवून पुन्हा एकत्र येऊ असा सर्वांना विश्वास होता. ते सर्वजण एकमेकांना फोन करून धीर देत होते. पण दोघा सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू झाला. ऑक्सिजन पातळीत घट झाल्याने शुक्रवारी दुपारी अपूर्वने आणि शनिवारी पहाटे आदित्यने अखेरचा श्वास घेतला. तर वडिल वायसीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. दुसरीकडे सासू आणि सून कोरोनातून बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. पण दोन कर्त्या मुलांचा मृत्यू झाल्याने त्यांना आपल्या अश्रूंचा बांध आवरता येत नाही. दत्तवाडी आकुर्डी येथील रहिवासी असणारे विजय जाधव याचे मध्यमवर्गीय सुखी कुटुंब होतं. अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी संसाराचा गाडा हाकलला होता. दोन्ही मुलांना चांगल्या ठिकाणी कामाला होती. घरात सर्वकाही सुखात सुरू होते. पण अचानक कोरोनाने दोन्ही भावांचा काही अंतराने दुर्दैवी मृत्यू झाला.