काय सांगता ! होय, ‘… तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तब्बल 905 कोटी वाचले असते’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येस बँकेवर निर्बंध घालण्याच्या एक दिवस आधीच बडोदा महानगरपालिकेच्या बडोदा स्मार्ट डेव्हलपमेंट कंपनीचे 265 कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेला देखील ही कल्पना दिली गेली असती तर त्यांचे 905 कोटी रुपये वाचले असते. परंतु गुजरात प्रेमापुढे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना इतर कोणी दिसत नाही असा टोला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.

येस बँकेवर निर्बंध आणल्यानंतर सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटवर हँडेलवरुन देशातील बँकांच्या स्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, येस बँकेवर निर्बंध घातल्याने महाराष्ट्रातील 109 बँका अडचणीत आल्या असून यात विदर्भातील मध्यवर्ती बँकांसह सहकारी बँका देखील आहेत. तसेच, अनेक पतसंस्थांच्या ठेवी देखील याच बँकेत आहेत. त्यामुळे आता या पतसंस्था अडचणीत सापडल्या आहेत अशी माहिती सावंत यांनी दिली.

सचिन सावंत यांनी दावा करत मोदी – शाहांवर टीका केली. त्यांना देशाची नव्हे फक्त गुजरातची काळजी असते, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. या महानगरपालिकेचे 905 कोटी रुपये येस बँकेत आहेत. मोदी शाहांनी बडोदा महापालिकेसारखेच किमान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कानात जरी सांगितले असते तरी ते या संकटातून वाचले असते, परंतु गुजरात प्रेमापुढे त्यांना इतर कोणी दिसत नाही असे म्हणावे लागेल, असा सणसणीत टोला देखील सचिन सावंत यांनी भाजपला लगावला.