सरकारला देशातील शेतकर्‍यांशी काहीच देणे घेणे नाही : राहुल गांधी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, युवक आणि सामान्य जनतेचा भ्रमनिरास केला आहे. काळे धन बाहेर येण्यासाठी नोटबंदी केली मग काळे धन गेले कोठे ? उद्योगपतींचे कर्ज माफ करणार्‍या या सरकारला देशातील शेतकर्‍यांशी काहीच देणे घेणे नाही, अशी टीका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर केली आहे. धुळे येथे आयोजित केलेल्‍या काँग्रेसच्या सभेत राहुल गांधी बोलत होते.

राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. धुळे येथील सभेत बोलत असताना राहुल गांधीनी मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की , ‘देशातील जनतेला फसविणार्‍या विजय माल्यासारख्या उद्योगपतींचे कर्ज माफ होऊ शकते. मात्र, कर्जामुळे आत्महत्येचा मार्ग पत्करणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफी देताना पंतप्रधान नरंद्र मोदी यांचे हात का आखडतात.’ मध्यप्रदेशात काँग्रेसने सत्तेवर येताच कर्जमाफी केली. अशीच कर्जमाफी प्रत्येक राज्यातील शेतकर्‍यांना देण्याचे आश्‍वासन राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात दिले.

मोदी प्रसिद्धीशिवाय राहू शकत नाहीत
मोदी यांचे प्रत्येक भाषण म्हणजे निवडणूक जुमला असते. नरेंद्र मोदी हे पाच मिनीटंही प्रसिद्धीशिवाय राहू शकत नाहीत. पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी या परिस्थितीत सर्व देशवासियांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं, मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. देशातील जवान शहीद होत असताना मोदी त्याचेही भांडवल करीत आहेत. असेही राहुल गांधी म्हणाले.

राफेल विमानाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर
धुळ्याच्या सभेत राहुल गांधीनी राफेल विमानाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला. राहुल गांधी यांनी राफेल करारावरुन उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावरही टीका केली. “साधं कादगाचं विमान न बनवू शकणाऱ्या कंपनीला राफेल विमानाचं कंत्राट देण्यात आलं, आणि यानंतर पंतप्रधानांच्या देखरेखी खालीच ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात गेले.”

यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, उल्हास पाटील, आमदार कांशीराम पावरा, माजी मंत्री हेमंत देशमुख, शोभाताई बच्छाव, तुषार शेवाळे उपस्‍थित होते.