‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’मध्ये बौध्द, शीख आणि जैनांचा देखील ‘समावेश’ करण्यात यावा,’या’ भाजपाच्या खासदारानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे जेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये बौद्ध, शीख आणि जैन समाजातील सदस्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली आहे की राम मंदिर ट्रस्टमध्ये दलित समाजातील एका व्यक्तिसह १५ सदस्य असतील त्यामुळे स्वामी यांच्या मागणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा केली आणि त्यातील अटींनुसार ट्रस्टचे सदस्य हे हिंदू असतील असे सांगण्यात आले होते. परंतु संविधानाच्या अनुच्छेद २५ नुसार मुस्लिम आणि ख्रिश्चन नसलेले लोक हे हिंदू आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी ट्रस्टमध्ये शीख, बौद्ध आणि जैनांचा समावेश करावा अशी मागणी स्वामींनी ट्विटच्या माध्यमातून केली होती.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये जवळपास १५ सदस्य असणार आहेत तर यापैकी ९ सदस्य हे कायमस्वरुपी तर ६ सदस्य नामनिर्देशित असणार आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात हे विश्वस्त मंडळ ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरण यांच्या घरामधूनच काम करणार आहे आणि ज्येष्ठ विधिज्ञ केशवन अय्यंगार परासरण देखील या विश्वस्त मंडळात आहेत. त्यांच्यासमवेत या विश्वस्त मंडळात जगतगुरू शंकराचार्य, युगपुरुष परमानंदजी महाराज, जगतगुरू माधवानंद स्वामी हे देखील सदस्य म्हणून असणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील पुण्याचे गोविंददेव गिरी, अयोध्येतील डॉक्टर अनिल मिश्रा, कामेश्वर चौपाल आणि निर्मोही आखाड्याचे धीरेंद्र दास यांचा देखील समावेश या विश्वस्त मंडळात करण्यात आला आहे.