पुणे : कर्मचाऱ्यानेच पळवला एजन्सीचा टेम्पो, सिलेंडर कमी दरात विकताना अडकला पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गॅस एजन्सीमध्ये आधी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच गॅसने भरलेला टेम्पो मित्रासोबत पळवला. त्यानंतर त्यातील गॅस सिलेंडर दुसऱ्या टेम्पोत भरून विक्री करत असतानाच ते दोघे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. हडपसर पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून २ टेम्पो आणि २९ गॅस सिलेंडर असा ३ लाख ९८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जयसिंग उर्फ गोरख विलास सावंत (वय ३८, रा. फुरसुंगी), सियाराम काशी चौहान (वय २६, फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाराम काशी चौहान हा मुळचा बिहारचा आहे. तो हडपसर परिसरातील समर्थ भारत गॅस एजन्सीमध्ये डेली बेसिसवर गॅस सिलेंडरची लोडींग अनलोडींगचे काम करत होता. तो मागील एक वर्षभरापासून हे काम करत होता. त्याला गोदामाची संपुर्ण माहिती होती. भरलेल्या गाड्यांची चावी कुठे असते त्याचीही त्याला माहिती होती. तर गोरख सावंत हा एचपी गॅस सिलेंडर डिलेव्हरीचे काम करत होता.

दोघांची एका कामानिमित्त ओळख झाली. त्यानंतर दोघांना एक प्लान तयार करून गोदामात कुणीच नसताना सिलेंडरने भरलेली एक गाडी तेथून पळवून नेली. त्यानंतर गोरख सावंत याने चोरीच्या सिलेंडर आपल्या गाडीत भरले. ती गाडी एका ठिकाणी सोडून दिली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी गोरख सावंत एच पी गॅस एजन्सीचा ड्रेस घालून हडपसर परिसरातील हॉटेल व घरगुती लोकांना एक्स्ट्रा सिलेंडर कमी किंमतीत विकत होते.

त्यावेळी हडपसर पोलिसांच्या तपास पथकाला याची माहिती मिळाली त्यावरून त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी याची कबूली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून २ टेम्पो, २९ सिलेंडर असा ३ लाख ९८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, किरण लोंढे, संजय चव्हाण, कर्मचारी युसुफ पठाण, राजेश नवले, औचारे, दळवी, पतुरे, प्रमोद टिळेकर, सदोबा भोजराज, प्रताप गायकवाड, नितीन मुंढे, अनिल कुसाळकर, अमित कांबळे, शाहिद शेख, ज्ञानेश्वर चित्ते, नाळे, शेख ,शिवले यांच्या पथकाने केली.