अल्पवयीन मुलीला पळवणारा दिल्लीतून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर येथून एका १७ वर्षाच्या मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला हडपसर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. आरोपीला ७ डिसेंबर रोजी दिल्ली पोलिसांच्या मदतीने सापळा रचून अटक केली. गणेश बाळनाथ गोरे (वय-२३ रा. घुले कॉलनी, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गणेश गोरे यांने १७ ऑगस्ट रोजी हडपसर येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. मुलीच्या घरच्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात गोरे विरुद्ध फिर्याद दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. मात्र, आरोपीने दरम्यानच्या काळात कोणतेही बँकेचे व्यवहार किंवा इतर गोष्टी केल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांना त्याचा शोध लावणे अवघड जात होते. पोलीस उप निरीक्षक प्रताप गिरी यांनी बातमीदारामार्फत आणि तांत्रीक बाबींचा तपास केला.

त्यावेळी आरोपी हा उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरीयाणा, जम्मु काश्मीर, दिल्ली या राज्यात मुलीला घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली.आरोपी मुलील घेऊन दिल्ली येथे आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिसांनी दिल्ली येथे दोन दिवस आरोपीचा शोध घेतला. आरोपी आणि पीडित मुलगी सुल्तानपुर येथे असल्याची खात्री झाली. हडपसर पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेतले. आरोपी गोरे याला दिल्ली येथील साकेत कोर्टात हजर करण्यात आले. दिल्ली न्यायालयाकडून ट्रॉन्झिट रिमांड घेऊन पुण्यात आणण्यात आले. आरोपीला पुणे न्यायालयात हजर केले असता १५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ही कारवाई परिमंडळ -५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनिल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी शिंदे, हमराज कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रताप गिरी, पोलीस कॉन्स्टेबल सुशांत गायकवाड, महिला पोलीस शिपाई छाया भिसे यांच्या पथकाने दिल्ली पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.