चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलास मारहाण, पोलिसावर गुन्हा दाखल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – सायकल चोरीच्या आरोपावरून शहरातील एका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने ११ वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली. पोलीस कर्मचाऱ्याच्या या कृत्याबद्दल मुलाच्या कुटुंबीयांनी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. अमर नवनाथ फसाळे असे मारहाण करण्यात आलेल्या बालकाचे नाव आहे. या प्रकारामुळे पोलीस दलातही खळबळ उडाली आहे. ज्याची सायकल चोरीस गेली होती तो या पोलिसाचा भाऊ आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमर नवनाथ फसाळे हा अल्पवयीन मुलगा एका खासगी क्लासबाहेर उभ्या असणाऱ्या सायकलला कुलूप नसल्याने तिचे चाक फिरवित होता. काही वेळातच ही सायकल चोरीला गेली. सायकलचा मालक दत्तू हळदे याने सायकल चोरीला गेल्याने परिसरात विचारपूस केली असता एकाने अमर फसाळे हा सायकलचे चाक फिरवित होता, असे सांगितले. दत्तूने पोलिसांत असणाऱ्या भावाला हा प्रकार सांगितल्यानंतर पोलिसाने त्या मुलाला घरी आणण्यास भावाला सांगितले. दत्तू याने अमरला उचलून घरी नेल्यानंतर पोलीस असणाऱ्या भावाने अमरला मारहाण केली.

नाशिक | चोरीच्या १९ दुचाकींसह टोळी जेरबंद

मुलगा घरी न परतल्याने अमरच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. तेवढ्यात अमर आणि दत्तू घरी आले. दोन तासांत सायकल आणून द्या, नाही तर मुलाला पोलिसांत नेण्याची धमकी देऊन दत्तू निघून गेला. त्यानंतर अमरने घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर नातेवाइकांनी संबंधित पोलिसाविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. यानंतर संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जाहिरात