Nagpur News : फडणवीसांच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्था वाढवली

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. आरोपामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर पोलिसांची मोठी सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. तसेच सशस्त्र जवानही तैनात केले आहेत.

परमवबबीर सिंग यांनी गृहमंत्र्यावर केलेल्या खळबळजनक आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या आरोपामुळे भाजपने देशमुख यांच्या मागणीसाठी रविवारी राज्यभरात निदर्शनेही केली. तर नागपुरात गृहमंत्री देशमुख यांच्या निवासस्थानासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे गृहमंत्री देशमुख यांच्या बंगल्यावरच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. दरम्यान भाजपाच्या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही नागपुरात प्रत्युत्तर देत आंदोलन केले आहे. निर्माण झालेली एकूणच राजकीय परिस्थिती लक्षात घेत पोलिसांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे. त्रिकोणी पार्क जवळ शीघ्र कृती दलाचे एक पथकही तैनात केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही ही सुरक्षा व्यवस्था उभारल्याची माहिती सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस यांनी दिली.