भाजपा उमेदवाराच्या मेहूण्याकडे पोलिसांना सापडलं 1 कोटी रूपयांचं ‘घबाड’ !

हैदराबाद : वृत्तसंस्था – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर रित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये भाजपचे उमेदवार एम. राघुनंदन राव यांच्या एका नातेवाईकाकडे असलेली १ कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम जप्त करण्यात आली आहे.

हैदराबाद पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दोन लोंकाना बेगमपेट भागात पकडले. त्यांच्याकडून १ कोटी रोख रक्कम, इनोव्हा आणि दोन मोबाईल जप्त केले गेले.

या कारवाईत पोलिसांनी सुरभी श्रीनिवास राव आणि वाहनचालक टी. रवीकुमार यांना अटक केली आहे. हे दोघे एका वाहनातून रोकड घेऊन जात होते. हे सर्व पैसे मतदारांना कथित स्वरुपात वाटण्यात येणार होते. सुरभी हा भाजप उमेदवार रघुनंदन राव यांचा मेहुणा असून, पोलिसांनी २ नोव्हेंबरला होणाऱ्या दुब्बक विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने ही रक्कम जप्त केली आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, सुरभी श्रीनिवास राव दुब्बक विधानसभा मतदारसंघातील मतदारांना पैसे वाटण्यासाठी ही रक्कम घेऊन जात होता. तर दुसरीकडे भाजपकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले. भाजपने हा TRS पक्षाचा आम्हाला बदनाम करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी २६ ऑक्टोबर रोजी रघुनंदन राव यांच्या एका नातेवाईकाच्या घरातून १२.८ लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली होती.