‘त्या’ मुजोर पोलीसाला मानवी हक्क आयोगाचा दणका, शिवीगाळ केल्याप्रकरणी ५० हजार रुपयांचा दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिसांकडून काही वेळा सामान्य नागरिकांसोबत गैरवर्तन केले जाते. अशाच एका प्रकारात राज्य मानवी हक्क आयोगाने एका पोलिस शिपायाला दणका दिला आहे. रिक्षाचालकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी एका पोलीस शिपायाला आयोगानं ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

विरार पोलीस ठाण्यात कार्यरत जगदिश पाटील असं या पोलीस शिपायाचं नाव आहे.

काय आहे नेमका प्रकार ?
रिक्षाचालक रमेश पाटील यांचा विरार परिसरात एका प्रवाशासोबत वाद झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा परवाना जप्त केला. त्यानंतर रमेश पाटील ५ एप्रिल २०१७ रोजी तो परवाना परत घेण्यासाठी विरार पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलीस शिपाई जगदीश पाटील तेथे होता. त्याने रमेश पाटील याला आई बहिणीवरून शिवीगाळ केली. त्यानंतर तो सर्व प्रकार रमेश पाटील यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांनी विभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे जगदीश पाटील यांच्या वर्तणूकीची तक्रार केली होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल न घेता काही कारवाईच केली नाही. त्यामुळे पाटील यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकड़े धाव घेतली.

पगारातून दंड कापून कारवाईचा आदेश
राज्य मानवी आयोगाने या प्रकाराची दखल घेतली. रमेश पाटील यांनी त्यांच्याकडील व्हिडीओ क्लीप आयोगासमोर सादर केली. पोलीस शिपाई जगदीश पाटील यांचे वर्तन पोलीस दलाला अशोभनीय आहे. तक्रारदार व्यक्तीची चूक नसताना त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे तो नुकसान भरपाईस पात्र आहे. त्यामुळे जगदीश पाटील याने रिक्षाचालक रमेश पाटील यांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. असा आदेश आयोगाचे अध्यक्ष एम.ए. सईद पोलीस महासंचालकांना दिला आहे. त्यासोबतच ही रक्कम जगदीश पाटील याच्या पगारातून कापली जावी आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी असेही या आदेशात म्हटले आहे.