लाच स्वीकारणारा जमादार अखेर बडतर्फ, पोलीस निरीक्षकही निलंबित

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस जमादारास अखेर सेवेतून बडतर्फ केल्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी २५ मे रोजी काढले आहेत. हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील तक्रारदाराकडून लाच स्वीकारणारा जमादार नंदकिशोर मस्के यास बडतर्फ केले तर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंगद सुडके हे बेजबाबदारपणे वागत असल्याने तसेच कोरोना सारख्या महामारीत कर्तव्यात निष्काळजीपणा करत असल्याने त्यांनाही पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी निलंबित केले आहे. या धडक कारवाईमुळे मात्र पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील एका तक्रारदाराचे अतिक्रमण काढून देण्यासाठी जमादार नंदकुमार मस्के याने त्याच्याकडे २५ हजारांची लाच मागितली होती. यात २0 हजार रुपये पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांच्यासाठी तर पाच हजार रुपये स्वत:साठी मागितले होते. त्यानंतर दहा हजारांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले. २४ मे रोजी माळसेलू शिवारात लाचलुचपतच्या पथकाने मस्केला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

मात्र या प्रकाराची माहिती न देताच हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आजारी रजा टाकली. सध्या कोवीडच्या काळात ही बाब गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी ही बाब गांभिर्याने घेत जमादार मस्केला थेट बडतर्फच करून टाकले तर सुडके यांना निलंबित केले आहे.