संतापजनक ! चक्क पोलिसाकडूनच १० वर्षाच्या मुलाचे ‘अपहरण’ ; CCTV फुटेजमुळे ‘पर्दाफाश’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – खंडणी उकळण्यासाठी एका पोलिसांनी आपल्याच मामाच्या १० वर्षाच्या मुलाचे साथीदाराच्या मदतीने अपहरण केल्याचे इस्लामपूर येथे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या पोलिसासह त्याच्या आणखी दोन साथीदारांना अटक केली आहे.

सुनिल कदम असे या पोलिसाचे नाव असून तो गडहिंग्लज पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. गोपाळ हिराप्पा गडदाकी आणि विलास बरमा वरई या त्याच्या साथीदारांना पोलिसांनी पकडले असून तिसऱ्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.

वरदराज खामकर (वय १०) असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अपहरणानंतर ३६ तासात पोलिसांनी वरदराज याची सुटका करुन तिघा अपहरणकर्त्यांना गजाआड केले आहे. वरदराज हा एक खासगी क्लासला गेला असताना सुनील कदम याच्या सांगण्यावरुन तिघांनी त्याचे अपहरण केले होते. वरदराजचे वडिल मालती वसंतदादा कन्या महाविद्यालयात नोकरी करतात. त्यांनी आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली तेव्हा सुनील कदम हा त्यांच्याबरोबर होता.

वरदराज हा सोमवारी सायंकाळी ५ वाजता क्लास सुटल्यानंतर बाहेर पडला. तेव्हा गोपाल गडदाकी याने त्याला तुझ्या बाबानी मला तुला आणायला पाठविले आहे, असे सांगून गाडीत बसायला सांगितले. पण, त्याला त्याने नकार दिला. तेव्हा गोपालने त्याला मोबाईलवर त्याचे वडिल बाळासाहेब यांचा आलेला फोन कॉल दाखविला. त्यावर विश्वास ठेवून वरद गाडीत जाऊन बसला. त्यानंतर तिघांनी त्याला शिये फाटा येथील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे ओळखपत्राशिवाय हॉटेलमालक खोली देण्यास तयार नसताना सुनील कदम याने आपण पोलीस असल्याचे सांगत दमदाटी करुन खोली देण्यास भाग पाडले. तिघांनी वरदला खोलीत कोंडून ठेवले.

वरदला घेऊन जाताना काही जणांनी पाहिले होते. त्यावरुन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करुन आरोपींचा माग काढला.

पोलीस रमजान ईदच्या बंदोबस्तात व्यस्त असतील आणि मामा पोलिसांत तक्रार करणार नाही, असा विचार करुन लाखो रुपयांची खंडणी वसुल करण्यासाठी सुनील कदम याने हा कट रचला होता. पण पोलिसांनी तातडीने केलेल्या तपासामुळे या आपण अडकतोय हे लक्षात येताच सुनील कदम फरारी झाला होता. इस्लामपूर पोलिसांनी बुधवारी त्याला वडणगे गावातून त्याच्या साथीदारांसह ताब्यात घेतले.