कोंढव्यातील ला बेला स्पावर छापा

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या कोंढव्यातील ला बेला स्पावर कोंढवा पोलिसांनी छापा घालून ७ महिलांची सुटका केली. याप्रकरणी स्पा मालकाला अटक केली असून फ्लॅट मालकीणसह दोघा महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वरुप रवी सबळ (वय २८, रा. कोणार्क युरेखा सोसायटी, वडगाव शेरी) असे या स्पा मालकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोंढवा पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस नाईक सुशिल धिवार यांना एनआयबीएम रोडवरील सनश्री वुडस कॉम्प्लेक्स येथील फ्लॅटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली मुलींना ठेवून वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी रविवारी सायंकाळी एक बनावट ग्राहक या ठिकाणी पाठविला. वेश्या व्यवसायासाठी पैसे घेतल्यानंतर त्याने सांकेतिक भाषेत पोलिसांना एसएमएस केला. त्याची खात्री होताच पोलिसांनी ला बेला स्पा येथे छापा घातला. तेथे सात महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी काऊंटरवरील स्पाचा मालक स्वरुप सबळ याला अटक केली आहे. या फ्लॅटची मालकीण तसेच तिच्याकडून फ्लॅट भाड्याने घेणाऱ्या दोघा महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार, सहायक निरीक्षक डी. आर. पवार, उपनिरीक्षक कदम, गिरी तसेच पोलीस कर्मचारी भापकर, जगताप, सुशिल धिवार, फडतरे, गणेश आगम, बंडगर, पवार, मोरे, बांदल यांनी केली आहे.

You might also like