‘राम किंवा अल्लाह’ मतदान करायला येणार नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था-देशभरात सर्वत्र राम मंदिराचा मुद्दा गाजत आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्याकरिता भाजपच्या एका खासदाराने खाजगी विधेयक आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. असे असतानाच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मतदान करायला राम किंवा अल्ला येणार नाहीत. जनताच सरकार निवडून देणार आहे, अशा शब्दांत अब्दुल्ला यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

२०१९ मध्ये प्रभू रामाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकू असं त्यांना वाटतंय. पण निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना राम मदत करणार नाही. राम किंवा अल्ला मतदान करायला येणार नाही, हे त्यांनी ध्यानात ठेवावं असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, आता राम मंदिर नाही झालं तर पुढची एक हजार वर्ष राम मंदिर होणार नाही, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. तर मुस्लीम राम मंदिराच्या विरोधात नाहीत. राम मंदिर भारतात नाही बांधणार तर काय पाकिस्तानात बांधणार का? असा सवाल कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार रोशन बेग यांनी केला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी राम मंदिराला समर्थन आहे म्हणजे भाजपला पाठिंबा आहे, असं होत नाही, असं स्पष्ट केलं.