मराठी मुलगी मशिदीवरील भोंग्यांविरोधात बोलल्यानंतर अबू आझमी अन् मनसेमध्ये जुंपली (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मानखुर्दमध्ये मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणीला धमक्या दिल्या असल्याची घडली आहे. मशिदीवरील भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती करिश्मा भोसले या तरुणीने केली होती. पण मशीद परिसरातील काही नागरिकांनी तिला विरोध करत तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर तिला धमक्या सुद्धा देण्यात आल्या. आता यावरुन महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

मशीद परिसरामध्ये नेमकी काय घटना घडली, याबाबतचा माहिती देणारा एक व्हिडीओ करिश्मा भोसलेंन ट्विट केला आहे. त्यात ती तिने म्हटलं आहे की, ‘२४ जूनला दुपारी ३ वाजता मी मशीद परिसरात गेले होते. तिथे जाऊन मी त्यांना भोंग्याचा आवाज कमी करण्यास विनंती केली होती. पण त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. आमचं कोणासोबत शत्रुत्व नाही. अझानलाही आमचा विरोध नाही. मात्र लाऊडस्पीकरवरील अझानला आमचा विरोध आहे’ असं करिश्माने बोलताना आपली भूमिका स्पष्ट सांगितली. तर मशिदीतील काही व्हिडीओ करिश्मा भोसलेंन ट्विट केले आहेत. त्यामध्ये तिचा काही मुस्लिम महिलांशी वाद होताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पोलीस करिश्मा आणि मुस्लिम नागरिकांना समजवत आहेत.

दरम्यान, या प्रकरणावरुन मानखुर्दमध्ये राजकारण देखील पेटलं आहे. मनसे कामगार विभागाचे अध्यक्ष महेश जाधव यांनी करिश्मा भोसले यांच्या लढ्याला पाठिंबा असल्याचं म्हणाले आहेत. ‘आम्ही करिश्माची भेट घेतली. या लढ्यात राज ठाकरे तिच्यासोबत असल्याचं आश्वासन दिलं. घर सोडण्यासाठी अबू आझमीसारखी माणसं तिला धमक्या देत आहेत. अशा फुटकळ लोकांकडे लक्ष देण्याची गरज नाही. राज्यातील मशिदींवर अनधिकृत असे भोंगे वाजतात. आमचा कोणताही धर्माला विरोध नाही. मात्र, सर्वधर्मसमभाव फक्त हिंदूंनीच पाळायचा का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हिंदूंना नियम सांगितले जातात. पण इतर धर्मीयांना त्यातून सूट दिली जाते. मशिदीवर पहाटे ४ वाजल्यापासून भोंगे सुरु होतात. त्याचा त्रास इतरांना होत असतो. याविरुद्ध करिश्मानं आवाज उठवला आहे. तिला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला, तर गाठ महाराष्ट्र सैनिकांशी आहे, असा इशारा देखील जाधव यांनी दिला आहे. तसेच ‘अबू आझमी यांनी मर्यादेत राहावं नाहीतर महाराष्ट्र सैनिक त्यांना ठोकून काढतील. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मर्यादेत राहायचं. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला धमकावयाचा प्रयत्न करायचा नाही. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रविरोधी गोष्टी करणे खपवून घेतल्या जाणार नाही. आमदार असून देखील महिलेबद्दल अशी भाषा वापरताना अबू आझमींना लाज वाटायला हवी. यापुढे कोणीही असा त्रास दिला तर खपवून घेणार नाही,’ अशी धमकी जाधव यांनी दिली.