रोहित पवार यांनी युवा कुस्तीपटू सोनालीला दिला मदतीचा हात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत तालुक्यात कापरेवाडी गावात एक उदयोन्मुख हरहुन्नरी कुस्तीपटू सोनाली कोंडीबा मंडलिक हिने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कुस्ती क्रीडाप्रकारात 2 वेळा सुवर्ण पदक मिळवले आहे. त्याशिवायही इतर अनेक स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. पण सध्या घरीच तयार केलेल्या झोपडीच्या तालमीत सोनालीचा सराव सुरू आहे. याची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे .

मुलीला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने ते स्वतःसाठी घर नसतानाही गोठयात राहून तिच्या खेळाची तयारी करून घेत आहेत. सोनाली सध्या कर्जतच्या महाविद्यालयाच 12वीचे शिक्षण घेत आहे. तिला आर्थिक पाठबळ मिळाले तर तिच्या स्वप्नांना नक्कीच भरारी मिळेल आणि ती भारताचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास व्यक्त करत तिला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आमदार रोहित पवार यांना एका ट्विटद्वारे सोनालीच्या संघर्षाची कहाणी समजली. त्यानंतर त्यांनी त्वरित या प्रकरणाची दखल घेत स्तुत्य असा निर्णय घेतला. सोनालीने खडतर परिस्थितीत मिळवलेल्या या यशाचा मला अभिमान आहे. तिच्याशी, तिचे पालक आणि वस्ताद यांच्याशी माझे बोलणंही झाले आहे. या भगिनीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मी स्वीकारली आहे .यशाची अशी अनेक शिखरे ती सर करेल, असा मला विश्वास आहे, असे ट्विट करत त्यांनी सोनालीला मदतीचा हात दिला.