‘त्या’ माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा मृत्यू नैसर्गिक नाही ; खुनाचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एनडी तिवारी यांचा मुलगा याचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये रोहितचा मृत्यू ‘अनैसर्गिक’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट सामोर आल्यानंतर कलाम ३०२ अंतर्गत रोहितची हत्या झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

काय आहे प्रकरण ?
बुधावारी रोहित तिवारी त्याच्या घरातच नाकातून रक्त येत असल्याच्या अवस्थेत नोकरांना दिसला होता. त्यानंतर रोहितच्या  आईशी संपर्क साधून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. यानंतर त्याच्या आईने देखील कुणावर संशय नसल्याचे सांगितले होते. रोहितच्या मृत्यू प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला. फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी रोहितच्या घराची झाडाझडती घेतली होती.

रोहितचा मृत्यू नैसर्गिक दिसत असला तरी त्याला मानसिक यातना देण्यात आल्या. ज्यांनी हे केले त्यांची नावे वेळ आल्यावर जाहीर करणार. कारण ही वेळ योग्य नाही, असे रोहितच्या आई उज्ज्वला यांनी सांगितले. त्यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली होती. आता शवविच्छेदन अहवालामध्ये रोहितचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा खून का आणि कोणी केला हे शोधवण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.