काय सांगता ! होय, धुळ्यात राहुल गांधींच्या नावे वीजबील, कंपनीची धावपळ

पोलिसनामा ऑनलाईन – राजकारणातील गांधी परिवारावरील प्रेमामुळे सध्या धुळ्यातील वीज कंपनीला डोकेदुखी सहन करावी लागत आहे. राहुल राजीव गांधी या नावाचे वीज देयक पाहून विद्युत कंपनीसह बहुतांश यंत्रणांची धावपळ उडाली आहे.

शहरातील माणिक नगरात व्यापारी राजीव हिरालाल गांधी राहत होते. राजकारणातील गांधी घराण्याबद्दल आवड असल्याने त्यांनी घरातील सदस्यांची नावे राजकारणातील गांधी घराण्यातील सदस्यांच्या नावाप्रमाणेच ठेवली होती. लग्नानंतर त्यांनी पत्नी छायाचे नाव सोनिया करुन घेतले. या दाम्पत्याने मुलाचे नाव राहुल उर्फ होशांग आणि मुलीचे प्रियंका असे ठेवले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी धुळ्यातील निवासस्थान शहाराम यादव यांना विकले. घर यादव यांच्या नावावर झाले. परंतु, तेथील वीज मीटर अजूनही राहुल राजीव गांधी यांच्या नावावर आहे. त्यामुळे पाच वर्षांपासून यादव यांना राहुल गांधी नावानेच वीज देयक मिळत आहेत. अचानक, हे वीज देयक सोशल मीडियावर धुळ्यात गांधीची मालमत्ता असल्याच्या चर्चेला उधाण आले. या वीज देयकासंदर्भातील सत्यता पडताळण्यासाठी यंत्रणेतील अधिकारी सक्रीय झाले. याचा त्रास सध्याचे घर मालक यादव यांनाही सहन करावा लागला.