परभणी जिल्ह्यातील शेत शिवारातील पिकांवर ओले संकट ?

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन- सप्टेंबरच्या मध्यापासून कधी कधी विश्रांती घेत पडत असलेला पाऊस परभणी जिल्ह्यातील ऊस, कापूस, सोयाबीन पिकाला हानिकारक ठरू लागला. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पडलेल्या पावसाने शेतीला मोठा फटका बसत आहे. जिल्हाभरात नदी नाले ओढे तुडुंब वाहत आहेत. काही ठिकाणी पिके पाण्यात गेल्याचे वृत्त समोर आले आहे. शेतशिवारात साधून आलेल्या सुगीला पाऊस अपायकारक ठरू लागला.

काही ठिकाणी कापूस लाल पडत असून फुल पाते गळत आहेत तर कापसाचे बोंडे नासत आहे. सोयाबीनच्या शेंगा ला कोंब फुटू लागले आहेत. पाऊस वाऱ्याने शेतातील उभा ऊस आडवा पडल्याचे समोर दिसून येत आहे. पर्जन्यवृष्टी चा जिल्ह्यात सर्वत्र फटका बसल्याचा मानला जातो. नदी नाले ओढे तुडुंब वाहत असून खोलगट भागातील शेत पिकांना मोठा फटका ही मानला जातो. पाण्याचा निचरा न होणाऱ्या शेत जमिनीवरील पिके धोक्यात आली आहेत. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून पुढे येत आहे.