माढ्यात शरद पवारांविरोधात ‘हा’ नेता रिंगणात 

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता मोठा राजकीय दबदबा असणाऱ्या शरद पवारांविरुद्ध निवडणूक रिंगणात कोण उतरणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती असे असताना पाणी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांनी माढा मतदारसंघातून आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. पंढरपुरातील वाटंबरे इथे काल (१० मार्च) झालेल्या मेळाव्यात प्रफुल्ल कदम यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. कदम माढा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

यावेळी बोलताना कदम म्हणाले, शरद पवार यांनी २००९ च्या निवडणुकीत मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पाळलं नाही. तर भाजपचे उमेदवार कुस्तीचे उमेदवार आहेत. त्यामुळे दुष्काळी माढा लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवारीची मागणी होत असल्याने आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे कदम यांनी सांगितले. टाटाच्या धरणातील पाणी शेतीला देण्याबाबत लढा उभा करणारे वॉटर किसान आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी काल सांगोला तालुक्यातील वाटंबरे इथे रात्री आयोजित केलेल्या मेळाव्याला शेतकरी आणि तरुण वर्गाने मोठा प्रतिसाद दिला.

या मतदार संघात जनता इतिहास घडवेल
आपण जनतेच्या निधीवर आणि पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचंही कदम यांनी नमूद केले. माढा मतदारसंघातील ८६० गावांशी पाणी चळवळीमुळे आपला थेट संबंध असून ही जनताच आता या मतदारसंघात इतिहास घडवेल, असा विश्वास प्रफुल्ल कदम यांनी व्यक्त केला. आमचा कोणता पक्ष नाही. कोणताही नेता नाही. आम्ही फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन निवडणूक लढविणार असुन शरद पवार यांना कसे निवडणूकीत पाडता येईल, हेच आम्ही पाहणार आहोत असे कदम म्हणले.

दरम्यान, एकीकडे पवारांच्याविरोधात सुभाष देशमुख यांनी शड्डू ठोकला असताना दुसरीकडे प्रफुल्ल कदम यांनी देखील पवारांना आस्मान दाखविण्याची भाषा केलीय. त्यामुळे माढा मतदार संघातून होणारी आगामी निवडणूक मोठी रंगतदार होणार यात शंका नाही.