साध्वी प्रज्ञा महान संत; मी मूर्ख प्राणी : केंद्रीय मंत्री उमा भारती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या भोपाळ मतदारसंघातील भाजपचे उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असतानाच मध्य प्रदेशच्या राजकारणातील दिग्गज नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी साध्वी प्रज्ञा यांना महान संत म्हटले आहे.

त्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या राजकारणात तुमची जागा आता साध्वी प्रज्ञा घेणार का असा प्रश्न उमा भारती यांना पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना त्यांनी साध्वी प्रज्ञा यांची तोंडभरून स्तुती केली. साध्वी यांची स्तुती करताना त्यांनी साध्वी प्रज्ञा या महान संत आहेत. त्यांच्याशी माझी तुलना करू नका. मी अगदीच सर्वसाधारण व्यक्ती आणि मूर्ख प्राणी असल्याचे विधान भारती यांनी केले आहे.

मध्य प्रदेशात असलेले काँग्रेसचे सरकार उमा भारती यांच्या बळावर भाजपने उलथवले होते. २००३ मध्ये भाजपने उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशात निवडणूक लढवून बहुतम मिळवले होते. उमा भारती मुख्यमंत्री बनल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी राजकारणातून १० वर्षे संन्यास घेतला होता. उमा भारती मुख्यमंत्री बनल्या मात्र, त्यांना आठच महिन्यात आपल्या पदाचा राजिनामा द्यावा लागला होता.

यानंतर या ठिकाणी बाबुलाल गौर आणि शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. १५ वर्षे भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेसने पुन्हा या ठिकाणी आपली सत्ता स्थापन करून कमलनाथ यांना मुख्यमंत्री पदी विराजमान केले.