‘कोरोना’मुळं मृत्यू होत नाही तर सर्व मृत्यू नैसर्गिक, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

पोलीसनामा ऑनलाईन, दि. 1 सप्टेंबर : देशासह महाराष्ट्र राज्यात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळून येताहेत. तर मृत्यू होणार्‍या रुग्णांचा आकडाही अधिक आहे. करोनाची लागण झाल्यामुळे देशात 64 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून आढळून येत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी करोनामुळे मृत्यू होत नाहीत, तर सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत, असा दावा केलाय. करोना विषाणूची लागण आहे, यावरही आपला विश्वास नाही, असेही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे विधान केलंय. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक स्थळं खुली करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केलं. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी करोना विषाणू आणि परिस्थितीवर भूमिका मांडलीय.

‘धार्मिक स्थळं खुली करण्यामागे तुमची नेमकी भूमिका काय आहे? गर्दी होऊ नये, असे प्रयत्न केले जात असताना अशी मागणी का केली जात आहे?’ असा प्रश्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना विचारला असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, सरकारला करोना विषाणूविषयी काहीही कल्पना नाही, असं मला वाटतंय. दुकानं सुरू करण्यासाठी, एसटी सुरू करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागतंय. आज मंदिरं उघडा, यासाठी आंदोलन केलं. हे शासन करोना विषाणूच्या नावावर लोकांना फसवतंय. करोना आहे, यावर माझा विश्वास नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

‘महाराष्ट्र राज्यात दररोज दोनशे ते अडीशे लोकांचा मृत्यू करोनामुळे होत असताना तुम्हाला असे का वाटतेय की सरकार करोनाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे?, करोनामुळे लोकांचा मृत्यू होतोय हे तुम्हाला का मान्य नाही?’ या प्रश्नावर भूमिका मांडताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले, जो माणूस जन्माला आला, त्याचा मृत्यू एकादिवशी होणारच आहे. जर दहा कोटी लोकांमध्ये दोनशे अडीचशे लोकांचा मृत्यू झाला, तर त्यात नवीन काय आहे? भारतीय स्वत:शी तर लढत असतात. पण, निसर्गाशी लढण्याचा आव आणत असतो. यापेक्षा अधिक प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, तर मी मान्य करेन. करोनाची लागण झाल्यामुळे हे मृत्यू होत नाहीत. सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत, असंही सांगत प्रकाश आंबेडकर म्हणाले,करोना विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा काय पुरावा आहे? पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे का?, की करोनामुळे मृत्यू झालाय? माझा यावर आजिबात विश्वास नाही. कारण, मी माणसं जगताना बघतोय, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.