काँग्रेसने दिलेल्या ‘त्या’ ऑफरवर प्रकाश आंबेडकर म्हणतात…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जागी झालेल्या काँग्रेसने आता पक्षातील मरगळ झटकण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी काँग्रेसने पाऊल उचलले आहे. यासाठी प्रदेश काँग्रेस मोठ्या प्रमाणात बैठकांचे आयोजन करत आहे.

त्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी न करता वंचित बहुजन आघाडीबरोबर जावे, अशी जरी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबडेकरांना आघाडीत येण्यासाठी खुली ऑफर दिली होती. या ऑफरवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले कि,आम्ही काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपूर्वी ऑफर दिली होती. सलग तीनवेळा पराभव झालेल्या १२ जागा आम्ही त्यांना मागितल्या होत्या, मात्र त्यांनी त्यावेळी अनुकूलता दाखवली नाही. उलट आमच्यावर भाजपची ‘बी टीम’ म्हणून प्रचार केला. त्यामुळे या आरोपांवर काँग्रेसने आगोदर स्पष्टीकरण द्यावे.

त्यानंतर आम्ही याबद्दल विचार करू असे त्यांनी बोलताना म्हटले आहे. त्याचबरोबर काँग्रेसबरोबर जाण्याबाबत आम्ही अद्याप काहीही विचार केलेला नाही, मात्र काँग्रेसने यावर स्पष्टीकरण दिल्यानंतर आम्ही आमच्या पक्षाच्या बैठकीत याबद्दल विचारमंथन करू,असेदेखील बोलताना त्यांनी सांगितले.

दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत वंचितला जास्त यश मिळाले नसले तरी ८ ते १० ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी लाखाच्या वर मते घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसला. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानावर काँग्रेस काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.