एकनाथ खडसे भाजपमधील नाराजांचे नेतृत्व करणार ? ओबीसी नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची ओबीसी नेत्यांसोबतची बैठक झाली आहे. प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आपण एकत्र यायला हवं, अशी भूमिका मांडल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.

भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. आता हे थांबवण्यासाठी आम्ही एकनाथ खडसे यांची भेट घेतली. तसेच याकरता इतर भाजपच्या नेत्यांची पण भेट घेणार असल्याचे शेंडगे यांनी स्पष्ट केले. महत्वाचे म्हणजे एकनाथ खडसेंना भेटण्यासाठी गेलेल्या शेंडगे यांच्या सोबत एकही भाजपचा सदस्य नव्हता. स्वत: प्रकाश शेंडगे हे सध्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे नाराज भाजप नेतेही शिवसेनेसोबत जाण्याचा विचार करत आहेत का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री गेल्यानंतर भाजपमधील नाराज नेत्यांनी डोकं वर काढले आहे. दरम्यान, विनोद तावडे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची काल भेट घेतली. खडसे यांच्या मुंबईतील निवासस्थानी दोन्ही नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी गेले. विनोद तावडे आणि खडसे यांच्यामध्ये पक्षातील नाराजी नाट्यावर चर्चा झाल्याचे वर्तवण्यात येत आहे. भाजपमधील नाराज नेते आता प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट भाजपवर टीका करताना दिसत असल्याने येत्या काळात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.