Coronaviurs : काय सांगता ! होय, ‘कोरोना’च्या ‘हेल्पलाईन’वर चक्क ‘टाईमपास’, आले ‘गोत्यात’

रामपूर :  वृत्तसंस्था  –  कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला.या दरम्यान, लोकांना घराबाहेर पडणं शक्य नाही.घरात बसून कंटाळा येतोय,म्हणून चक्क लोक ‘टाईमपास’ होईल या हेतूने सरकारने दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करताना दिसत आहे. खरं म्हणजे,सरकारने नागरिकांना लॉकडाऊनच्या कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागू नये,गरजेच्या वस्तू, वैद्यकीय किंवा तत्सम मदत उपलब्ध होण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले.या क्रमांकावरती अनेक गरजू लोकांचे मदतीसाठी फोन कॉल येत आहे.मात्र,काही जण जाणूनबुजून या क्रमांकाचा दुरुपयोग करताना दिसले.कुणी या क्रमांकावरती कॉल करून पिझ्झाची डिलिव्हरी मागितली,तर कुणी समोसा तर कुणी पानाच्या विड्याची मागणी केली. एकाने तर अतिरेकच करत आपल्या पाळीव कुत्र्याला मोकळ्या हवेत फिरवण्याची मागणी करत हेल्पलाईन क्रमांकावर कॉल लावला.मग काय अगोदरच कामानं हैराण झालेल्या पोलिसांनी आपल्या बुद्धिचातुर्याचा उपयोग करत या लोकांना चांगली अद्दल घडवली.

रामपूर मधील अशाच एका व्यक्तीने हेल्पलाईन क्रमांकाला फोन लावत समोसे आणि चटणीची मागणी केली.मात्र अगोदर त्यांना विनम्रतेने नकार देण्यात आला.परंतु, या व्यक्तीनं वारंवार फोन करत जिल्हाधिकाऱ्यांना हैराण केलं.

तर दुसऱ्या एका महाभाग व्यक्तीने तर जिल्हा प्रशासनच्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करत पानाच्या विड्याची मागणी केली. पण त्याला स्पष्ट नकार देण्यात आला,तेव्हा फोनवरच तावातावात भांडू लागला.वरून ‘मदत करून शकत नाही तर मग हेल्पनाईन कशाला चालू केली?’ असा उलट प्रश्नही त्यानं विचारला.

मग काय जिल्हाधिकाऱ्यांनी या महाभाग व्यक्तीच्या घरी धडक देत समोसे-चटणी आणि पानाचा विडा धाडला आणि ताब्यात घेत चांगलाच धडा शिकवला.सुरु असलेल्या परिस्थितीच गांभीर्य न समजणाऱ्या लोकांना रस्ते आणि नालेसफाईचे काम देण्यात आलं. सफाईचा कामानंतरही हे लोक सुधारले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल,असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं.

दरम्यान, केलेल्या कार्यवाही मुळे प्रशासनाला पिझ्झा आणि दारूसाठीचे येणारे कॉल कमी झाल्याचे लखनऊच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.