फडणवीस, दरेकर यांच्यावर कारवाई होणार?, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकाची चौकशी सरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेणे फडणवीस यांना अडचणीच ठरु शकते. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला असून हा सरकारी कामातील हस्तक्षेप आहे. या प्रकरणी काय कारवाई करता येईल यासंदर्भातील निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करुन घेऊ, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना वळसे-पाटील यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.

शनिवारी रात्री मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माचे संचालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती की, 50 हजार रेमडेसिवीर येत आहे. त्याच्या चौकशीसाठी ब्रुक फार्माच्या संचालकांना चौकशीसाठी बोलावले होते, असा खुलासा दिलीप वळसे-पाटील यांनी केला. ज्यावेळी संबंधित अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलावले होते. तेव्हा फडणवीस आणि दरेकर यांनी त्याठिकाणी हस्तक्षेप केला. पोलीस चौकशी करायची असेल तर कोणास ही बोलावू शकतात. शासकीय कामात हस्तक्षेप त्यांनी केला. पोलिसांवर दबाव टाकणे योग्य नाही, अशी टीका वळसे-पाटील यांनी केली.

दिलीप वळसे पाटील यांनी पुढे सांगितले. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा का याची माहिती घेत आहोत, या संदर्भात चौकशी करुन भूमिका घेतली जाईल, असेही सूचक विधान त्यांनी केले. पोलिसांकडे माहिती होती. त्यामुळे चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशी करण्यासाठी पुन्हा बोलवू असे सांगून संबंधित संचालकाला सोडले. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते पण नंतर त्यांने परवानगीचे पत्र दाखवल्याने सोडण्यात आले. त्याला चौकशीसाठी पुन्हा बोलावले जाईल, असे पोलिसांनी सांगितले असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. या संदर्भात मुंबई पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नेमका हा साठा कोणाला दिला जाणार होता, याची चौकशी करण्यात येईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, हा साठा पोलिसांनी जप्त केला नाही, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.