अन् कल्याण खाडीत ‘प्रिन्सी’चं धड सापडलं, परधर्मीय मित्रासोबत होते प्रेमसंबंध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – परधर्मीय मुलाशी असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध असल्यानेच जन्मदात्या पित्यानेच प्रिन्सी (वय 22 ) मुलीची अत्यंत निर्घृणपणो हत्या केली होती. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर एका बॅगेत तुकडे केलेल्या अवस्थेमध्ये तिचा मृतदेह 8 डिसेंबर रोजी पहाटे 5.25 वाजण्याच्या सुमारास मिळाला होता. त्यानंतर आता कल्याण खाडीत प्रिन्सीचे धड सापडले आहे. तिचे शिर अद्याप सापडले नसल्याने गुरुवारी पुन्हा शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.

कल्याण येथील खाडीत प्रिन्सीचा मृतदेह फेकल्याची माहिती अरविंदने चौकशीदरम्यान दिल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी प्रिन्सीच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना अपयश आल्याने बुधवारी सकाळी 9 च्या सुमारास पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली. कल्याण खाडीत फेकून दिलेला कंबरेवरचा भाग महात्मा फुले चौक पोलिसांनी अग्निशमन विभाग आणि कोळीबांधवांच्या मदतीने बुधवारी दुपारी शोधून काढला. मात्र, तिचे शिर अद्याप सापडले नसल्याने गुरुवारी पुन्हा शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण –

कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर एक व्यक्ती मोठी बॅग घेऊन गोवा नाका, भिवंडी येथे जाण्यासाठी एका रिक्षामध्ये बसला होता. परंतु, बॅगमधून दुर्गंध येत असल्याने रिक्षा चालकाला त्याचा संशय आला. त्याला या रिक्षा चालकाने हटकल्यानंतर हा प्रवाशी ती बॅग सोडून तिथून पळून गेला. याच बॅगेच्या तपासणीमध्ये एका 20 ते 25 वर्षीय महिलेचा कमरेपासून खालील शरीराचा तुकडे केलेला भाग मिळाला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित बॅग घेऊन येणारी व्यक्ती टिटवाळा ते कल्याण असा रेल्वेने आलेली दिसली. त्यावरून पोलिसांनी शोध लावला होता.

परधर्मीय मुलाशी असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध असल्यानेच जन्मदात्या पित्यानेच अरविंद तिवारी याने प्रिन्सी या 22 वर्षीय मुलीची अत्यंत निर्घृणपणो हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले होते.

प्रिन्सीचे परधर्मीय तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. हेच प्रेमसंबंध अरविंदला मान्य नव्हते. 6 डिसेंबर रोजी टिटवाळा, इंदिरानगर येथील आपल्या घरातच त्याने तिला आधी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर करवतीच्या सहाय्याने तिचे धड आणि कंबरेखालचा भाग वेगळा केला.

 

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/